मालेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मालेगाव येथील गिरणा नदीपात्रात पुराच्या पाण्यात अडकलेल्या १५ जणांची तब्बल १९ तासानंतर लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली. मोठ्या प्रतिक्षेनंतर या सर्वांची सुटका करण्यात यश आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
मालेगाव आणि धुळे येथील रहिवासी असलेले एकूण १५ जण रविवारी दुपारी हौस म्हणून शहराजवळील सवंदगाव शिवारातील नदीपात्रात मासेमारीसाठी गेले होते. नदीपात्रातील एका टेकडीवर उभे राहून हे लोक मासेमारी करत असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक पुराचे पाणी व प्रवाह वाढला. त्यामुळे ही टेकडी पुराच्या पाण्याने वेढली गेल्याने हे सर्वजण तेथे अडकून पडले. या संदर्भात माहिती मिळाल्यावर मालेगाव महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख डॉ. संजय पवार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. परंतु, पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे नदीपात्रातील या टेकडीपर्यंत मदतकार्य पोहोचविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना मर्यादा आल्या. त्यामुळे रात्री धुळे येथून आपत्ती व्यवस्थापनाच्या बचाव पथकास पाचारण करण्यात आले. परंतु, अंधार व पाण्याची खोली, मोठा प्रवाह यामुळे बचावकार्य करता आले नाही. त्यामुळे रात्रभर हे सर्वजण अन्नपाण्यावाचून टेकडीवरच अडकून पडले.
दोरखंड वा होडीच्या सहाय्याने बचाव कार्य शक्य नसल्याने या लोकांची सुटका हेलिकॉप्टरच्या सहाय्याने करण्याचे प्रशासनाने ठरविले. त्यानुसार सोमवारी गांधीनगर येथील लष्करी हवाई दलाच्या प्रशिक्षण संस्थेशी (कॅट्स) संपर्क साधण्यात आला. दलाचे वैमानिक ध्रुव हेलिकॉप्टर घेऊन घटनास्थळी पोहोचले. एका वेळी पाच जण याप्रमाणे तीन फेऱ्या मारुन हेलिकॉप्टरद्वारे दुपारी १२ वाजता या सर्वांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर त्यांना सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.