रावेर, प्रतिनिधी | तालुक्यात अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या मका, ज्वारी, कापूस या पिकांचे सरसकट पंचनामे करावे, गरज पडल्यास आणखी काही दिवस वाढवून द्यावे, प्रशासनाने शेतक-यांच्या बांधापर्यंत जाऊन धीर देऊन नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, असे निर्देश आमदार शिरीष चौधरी यांनी महसूल प्रशासनाला दिले आहे.
तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या आढावा घेण्यासाठी आमदार चौधरी येथे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, आर.के. पाटील, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, यावल पंचायत समिती सदस्य शेखर पाटील आदी उपस्थित होते.
तालुक्यात अनेक ठिकाणी ज्वारी, मका, यांचा पंचनामा सुरु असून अवकाळी पावसामुळे तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने सर्व खरीप पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत संबंधीत गावाचे तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांना तत्काळ महसूल प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व शेतकर-यांच्या नुकसान झालेल्या प्रत्येक शेतक-यांच्या पिकाचे पंचनामे करण्यात येणार असल्याचे तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी यावेळी सांगितले.
हेक्टरी ५० हजार मदत द्यावी : राष्ट्रवादी तालुक्यात ज्वारी, मका, कापसाचे मोठे नुकसान झाले असून तालुक्यातील शेतक-यांना ५० हजार हेक्टरी मदत करण्याची मागणी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी केली आहे. याआधी एवढे मोठे नुकसान कधीच बघितले नसल्याचे पंचायत समिती सदस्य योगेश पाटील यांनी यावेळी सांगितले तर संपूर्ण महाराष्ट्रभरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केली.