मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) गंभीर झाले असून, संपूर्ण स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीचा सखोल आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 22 डिसेंबर रोजी पार पडलेल्या बीसीसीआयच्या एपेक्स कौन्सिल बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, या पराभवामागील कारणांचा सखोल तपास केला जाणार आहे.

आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर-19 संघाने आशिया कपमध्ये दमदार कामगिरी करत सलग सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, जेतेपदाच्या निर्णायक लढतीत संघाची कामगिरी पूर्णपणे कोलमडली. गोलंदाजांना पाकिस्तानच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवता आले नाही, तर फलंदाजांची फळीही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना अपयशी ठरली. त्यामुळे बीसीसीआयने केवळ आकडेवारीपुरता नव्हे, तर मानसिकता, तयारी आणि निर्णयक्षमतेचाही आढावा घेण्याचे ठरवले आहे.

अंतिम सामन्यातील पराभवाबाबत टीम मॅनेजमेंटकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवण्यात येणार असून, विशेषतः दबावाच्या सामन्यात संघाची रणनीती का फसली, यावर चर्चा होणार आहे. क्रिकबजच्या वृत्तानुसार, अंडर-19 संघाचे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांच्याशी थेट चर्चा केली जाणार असून, ही चर्चा परफॉर्मन्स रिव्ह्यूचा महत्त्वाचा भाग असेल.
दरम्यान, अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्या मैदानावरील वर्तणुकीबाबतही बीसीसीआयने चिंता व्यक्त केल्याची माहिती आहे. या प्रकरणावर अंतर्गत पातळीवर चर्चा होण्याची शक्यता असून, शिस्तभंगाच्या मुद्द्यावर काही पावले उचलली जाऊ शकतात. मात्र, ही बाब अधिकृत रिव्ह्यू प्लॅनचा भाग आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही.
भारतीय अंडर-19 संघाला येत्या काळात झिम्बाब्वे आणि नामीबिया येथे होणाऱ्या अंडर-19 विश्वचषकात सहभागी व्हायचे आहे. त्या स्पर्धेसाठी संघाची घोषणा अद्याप बाकी असून, विश्वचषकापूर्वीच आशिया कपमधील अपयशाचा आढावा पूर्ण करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. भविष्यात अशा मोठ्या सामन्यांत अपयश टाळण्यासाठी कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने समीर मिन्हासच्या दमदार शतकाच्या जोरावर 347 धावांचा डोंगर उभा केला. 348 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. तिसऱ्याच षटकात 32 धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर आयुष म्हात्रे सात चेंडूत दोन धावा करून बाद झाला. त्यानंतर आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू आणि कनिष्क चौहान झटपट बाद झाले. दीपेश देवेंद्रनने 36 धावा करत थोडा प्रतिकार केला, मात्र अखेर संपूर्ण संघ 156 धावांत गारद झाला आणि भारताला 191 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला.
या पराभवानंतर बीसीसीआयचा आढावा आणि संभाव्य कारवाई भविष्यातील अंडर-19 संघाच्या वाटचालीसाठी निर्णायक ठरणार असून, विश्वचषकापूर्वी संघात बदल किंवा कडक संदेश दिला जाण्याची शक्यता आहे.



