
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशातील ख्यातनाम विधीतज्ज्ञ, आणि अनेक संवेदनशील खटल्यांमध्ये यशस्वी बाजू मांडणारे जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र अॅड. उज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे राष्ट्रपती यांनी ही नियुक्ती अधिकृतपणे जाहीर केली असून, राष्ट्रपतींच्या कोट्यातून ही संधी त्यांना बहाल करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यात आणि विधी क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

उज्वल निकम यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक खळबळजनक गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा खटला असो वा प्रशांत साने, खुर्शीद अन्वरसारखे गुन्हेगार असोत — उज्वल निकम यांनी यशस्वीपणे सरकारची बाजू न्यायालयात मांडली आणि दोषींना शिक्षा मिळवून दिली. त्यामुळे ते देशपातळीवर ओळखले जातात आणि विधी क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
गेल्या वर्षी भारतीय जनता पक्षाने त्यांना मुंबईमधून लोकसभेचे उमेदवारी दिली होती. अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर त्यांचा निसटता पराभव झाला, मात्र त्यांच्या कार्यक्षमतेवर पक्षाचा विश्वास कायम राहिला. या पार्श्वभूमीवर आता राज्यसभेत त्यांना प्रतिनिधित्वाची संधी दिली गेली आहे, ही बाब त्यांच्या समर्थकांसाठी आणि विधी व्यवसायात त्यांच्या योगदानाचा सन्मान करणाऱ्यांसाठी अत्यंत गौरवाची आहे.
अॅड. निकम यांच्याकडे दीर्घ अनुभव, विद्वत्ता आणि देशहितासाठी निष्ठेने कार्य करण्याची ताकद आहे. त्यांची नियुक्ती विधी क्षेत्रात नवी ऊर्जा आणि मार्गदर्शन निर्माण करणारी ठरेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. तसेच विधीविषयक धोरणे, न्यायव्यवस्थेतील सुधारणा आणि जनहितासाठीचे मुद्दे संसदेत प्रभावीपणे मांडण्यास त्यांचा अनुभव उपयुक्त ठरणार आहे.
या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्याच्या नावाला देशपातळीवर नवा प्रतिष्ठेचा टिळा लाभला आहे. उज्वल निकम यांच्यावर आता नव्या जबाबदाऱ्या असून, संसदेत त्यांचे प्रभावी योगदान पाहण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



