जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार व कामगार क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तीमत्व म्हणून लौकीक असणारे माजी ज्येष्ठ नगरसेवक विजयबापू पंडितराव कोल्हे यांचा आज निधन झाल्याने समाजाच्या सर्व स्तरांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
जळगाव शहराचा इतिहास ज्या घराण्याच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, त्या कोल्हे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य विजयबापू पंडितराव कोल्हे यांनी आज रात्री शेवटचा श्वास घेतला. स्वातंत्र्यसैनिक पंडितराव कोल्हे यांचे चिरंजीव असणार्या विजयबापूंनी त्यांचा समाजसेवेचा वारसा समर्थपणे चालविला. ऐशीच्या दशकात तत्कालीन जळगाव नगरपालिकेपासून आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा करणार्या विजयबापूंनी सातत्याने जवळपास ३५ ते ४० वर्षे नगरसेवकपद भूषविले. त्यांच्या सौभाग्यवती सिंधूताई कोल्हे यांना नगराध्यक्षपद तर चिरंजीव ललीतभाऊ यांना महापौरपदाची संधी देखील मिळाली.
जळगावच्या औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असणार्या रेमंडमधील कामगार युनियनवर देखील जवळपास ३० वर्षे त्यांचे वर्चस्व होते. या कालावधीत त्यांनी कामगार कल्याणाच्या अनेक योजना आखल्या. तर आपले बंधू कै. दिलीपअण्णा यांच्या मदतीने लेवा पाटीदार समाजातील सामुदायीक विवाह सोहळ्यासह अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग होता. तर, काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव काम केले.
आज रात्री अल्पशा आजाराने विजयबापू कोल्हे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी एक वाजता अंत्यंस्कार करण्यात येणार आहे. ते माजी महापौर ललीतभाऊ कोल्हे यांचे वडील तर शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सरीताताई माळी-कोल्हे यांचे सासरे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. विजयबापूंच्या निधनाने समाजाच्या सर्व स्तरांमधील शोक व्यक्त करण्यात येत आहे.