जळगाव, प्रतिनिधी | येथील शाहूनगर रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीवर सुमारे शंभर ते दीडशे घरांचे बांधकाम करून अतिक्रमण केल्याने गटार भरली आहे. या गटारीला काढण्यासाठी जागा नसल्याने गटारीतील सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याची तक्रार नागरिकांनी महापालिकेत केली होती. यानुसार आज महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने अतिक्रमण निर्मूलन मोहिम हाती घेऊन ५७ घरांचे गटारीवरील अतिक्रमण काढले.
शाहूनगर येथील पोलिस चौकी ते ट्रॅफीक गार्डन रस्त्यावरच्या बाजूला मोठी गटार आहे. परंतू या गटारीवर नागरिकांनी थेट पक्के बांधकाम करून घराचा भाग वाढवून, बाथरुम, शौचालये, लोखंडी जिने लावून अतिक्रमण केले होते. त्यामुळे गटार काढण्यास जागा नसल्याने ही गटार घाणीमुळे चोकअप झाल्याने गटारीचे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, आजाराचे प्रमाण वाढले होते. नागरिकांच्या तक्रारीवरून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने उपायुक्त उत्कर्ष गुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. याठिकाणी महापौर सिमा भोळे, आमदार सुरेश भोळे. तसेच आरोग्य विभाग, पाणीपुरवठा, विद्यूत विभागाचे अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते. पोलिस चौकी ते ट्रफीक गार्डन पर्यंतच्या रस्त्यालगत गटारीवर सुमारे दिडशे घरांचे पक्के बांधकाम होते. त्यामुळे गटार काढण्यास सफाई कर्मचाऱ्यांना जागा नसल्याने गटार तुंबली होती. दोन ठिकाणी अतिक्रमण काढतांना अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी व नागरिकांमध्ये वाद झाला. त्यामुळे काही वेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवून कारवाई सुरळीत केली. दरम्यान, उर्वरित कारवाई ही दोन ते तीन दिवसात केली जाणार आहे.