मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर महावितरण विभागामध्ये प्रभारी कार्यकारी अभियंता विवेक स्वामी यांची झालेल्या विनंती बदलीच्या अनुषंगाने कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता देण्यात येऊन विवेक स्वामी यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे शिवसेना शहर प्रमुख गणेश टोंगे यांनी पत्रकार परिषदेद्वारे मागणी केली आहे. मुक्ताईनगर महावितरण विभागामध्ये एक वर्षांपूर्वी कार्यकारी अभियंता ब्रिजेश गुप्ता यांची अचानक बदली झाल्यानंतर अतिरिक्त कार्यकारी अभियंता विवेक स्वामी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला होता. परंतु दोन महिन्यापूर्वी महावितरण विभागांमध्ये प्रशासकीय बदल्या झालेल्या होत्या त्या अनुषंगाने प्रभारी कार्यकारी अभियंता विवेक स्वामी यांनी विनंती बदलीचा अर्ज केला होता त्या अनुषंगाने त्यांची बदली झालेली होती परंतु त्यांच्या जागेवर त्यांना रिलीव्ह करण्यासाठी कोणीही अधिकारी मुक्ताईनगर विभागीय कार्यालयात हजर झाला नाही. त्यामुळे महावितरण विभागासह परिसरातील नागरिक शेतकऱ्यांमध्ये महावितरणच्या या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व असंतोष आहे.
विशेष खेदाजी बाब म्हणजे प्रभारी कार्यकारी अभियंता यांची विनंती बदली झाल्यानंतर मुक्ताईनगर महाविरतन विभागांमध्ये प्रभारी राज कायम राहावा यासाठी विभागातील काही प्रभारी अधिकाऱ्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांनी मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्यावर आर्थिक दबाव आणून विभागातील प्रभारी राज कायम ठेवण्यात आलेले असल्याची चर्चा महावितरण विभागामध्ये जोरात सुरु याआधी सुद्धा काही महिन्यांपूर्वी प्रभारी कार्यकारी अभियंता विवेक स्वामी यांची बदली धुळे येथे झाली होती. परंतु त्यावेळेस सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ठेकेदारांच्या मार्फत आर्थिक देवाणघेवाण करून स्वामी यांची बदली रद्द झाली होती. या सगळ्या प्रक्रियेमागे त्यांच्या मर्जीतील ठेकेदार महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रभारी राज कायम राहण्यासाठी आर्थिक रसद पुरवत आहेत अशी चर्चा महावितरण प्रशासनामध्ये सर्रास सुरू आहे. हे लाडके ठेकेदार कार्यकारी अभियंता यांच्या अवतीभवती तसेच दालनात कायमस्वरूपी ठाण मांडून बसलेले असतात.
जेणेकरून विभागातील इतर कोणत्याही ठेकेदाराला काम न मिळू देणे अथवा मिळालेले काम का.अ. यांच्या साह्याने अनावश्यक त्रुटी काढुन, धमकाऊन कॅन्सल करणे. ज्यांनी काम केले त्यांचे बिल निघू न देणे एवढेच नसून हेच ठेकेदार शेतकऱ्यांना सुद्धा अनावश्यक ब्लॅकमेल करत आहेत. या चालू पावसाळ्यात महावितरण विभागातील निकृष्टपणे उभे केलेले बरेच पोल आडवे पडलेले असून महावितरण विभागामार्फत त्यांना सुरळीत विद्युत पुरवठा करून देणे बंधनकारक असताना हे ठेकेदार संबंधित शेतकऱ्यांकडून त्याचे अवैधपणे पैसे घेत आहेत व प्रभारी कार्यकारी अभियंता यांचे आशीर्वादाने शासनाकडून त्या केलेल्या कामाचे बिलेही काढत आहेत. त्यामुळे या प्रभारी प्रशासनाबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष आहे.
एवढेच नसून स्वामी यांनी कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज स्वीकारल्यानंतर कंत्राटी बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचे त्यांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीच्या निषेधार्थ आंदोलनही महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता व त्याच वेळेस त्यांची बदली होणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे मुक्ताईनगर महावितरण विभागामध्ये प्रभारी कार्यकारी अभियंता विवेक स्वामी यांची झालेल्या विनंती बदलीच्या अनुषंगाने त्यांना तात्काळ कार्यमुक्त करून कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी महावितरण प्रशासनाकडे शिवसेना शहर प्रमुख गणेश टोंगे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे मागणी केली आहे.