खामगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खामगाव शहरातील महावीर चौकात उभारलेला महावीर स्तंभ हा जैन समाजासाठी वंदनीय असून, त्याच्या पावित्र्यावर अनधिकृत बॅनर्स आणि अतिक्रमणांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्री सकल जैन संघ, खामगाव यांच्या वतीने मुख्याधिकारी श्री. प्रशांत शेळके यांना निवेदन सादर करण्यात आले.
महावीर स्तंभ हा अहिंसा, शुद्धता आणि धार्मिक श्रद्धेचे प्रतीक असून, जैन समाजाच्या धार्मिक भावनांशी निगडित आहे. मात्र, सध्या या स्तंभावर अनधिकृत बॅनर्स लावले जात असून, परिसरात अतिक्रमणही वाढले आहे. त्यामुळे या स्थळाच्या पावित्र्यावर आघात होत आहे आणि जैन समाजाच्या भावनांना धक्का पोहोचत आहे.
महावीर जयंती (१० एप्रिल) पूर्वीच हे अनधिकृत बॅनर्स व अतिक्रमण हटवण्यात यावे आणि या ठिकाणी “नो बॅनर्स झोन” घोषित करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हिरेनभाई लोडाया यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित होते. आता नगर परिषद यावर काय निर्णय घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.