मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथे आयोजित अस्मिता सायकल लीग स्पर्धेत खडसे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले असून त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय खेल प्राधिकरणाच्या अस्मिता लीग 2025-26 अंतर्गत ही सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय युवकल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि जळगाव जिल्हा सायकल असोसिएशन यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील युवती व महिलांना खेळाचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

दि. २२ मार्च २०२६ रोजी मुक्ताईनगर क्रीडा संकुल येथे १४, १७, १९ व त्यापुढील वयोगटातील मुली व महिलांसाठी ही स्पर्धा पार पडली. तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच समाजातील महिलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुक्ताई क्रीडा संकुल ते कोथळी ओव्हरब्रिज या सुमारे पाच किलोमीटर अंतरावर ही सायकल स्पर्धा घेण्यात आली होती.
या स्पर्धेत १९ वर्षे व त्यावरील वयोगटात खडसे महाविद्यालयाच्या क्रीडा विभागामार्फत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. दीपाली पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले, तर सुवर्णा पाटील हिने द्वितीय क्रमांक, साक्षी पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच नयना सपकाळे हिने चौथा, ज्योती बागरे हिने पाचवा आणि शीतल शिंदे हिने सहावा क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या सर्व सायकलपटूंना गोल्ड मेडल, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशामुळे खडसे महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे विशेष कौतुक होत असून विद्यार्थिनींच्या मेहनतीला योग्य फळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील मुलींना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळत असून भविष्यात अधिकाधिक महिलांनी क्रीडाक्षेत्रात पुढे यावे, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.



