मुंबई वृत्तसंस्था । व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल यांनी गेल्याच आठवडय़ात येत्या १ डिसेंबरपासून त्यांच्या मोबाईलधारकांवर दरवाढ लादण्याचे जाहीर केले. पाठोपाठ रिलायन्स जिओनेही दरवाढीचा निर्णय घेतला असून खासगी दूरसंचार कंपन्यांकडून प्रत्यक्षात किती दरवाढ होईल, हे येत्या तीन दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
रिलायन्स जिओने तिसऱ्या वर्धापन दिनानंतर जाहीर केलेल्या दरवाढीला सुरुवातीला स्पर्धक खासगी दूरसंचार कंपन्यांनी विरोध दर्शविला होता. मात्र व्होडाफोन आयडिया व भारती एअरटेलनेही अखेर दरवाढ जाहीर केली. दरम्यान, खासगी दूरसंचार कंपन्यांच्या प्रमुखांनी बुधवारी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षांची भेट घेतली. दूरसंचार क्षेत्रातील विविध समस्या तसेच आव्हानांबाबत ठोस पावले उचलण्याची अपेक्षा यावेळी प्रमुखांनी अध्यक्षांकडून व्यक्त केली. नव्या वर्षांत यापैकी काही मुद्दे निकाली निघतील, अशी ग्वाहीही अध्यक्षांनी यावेळी दिली. त्याप्रमाणे, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या सूत्रानुसार मात्र खासगी कंपन्यांच्या दरवाढीच्या निर्णयात हस्तक्षेप होणार नाही. तसेच या कंपन्यांना दरवाढीचा किमान स्तर निश्चित करण्याबाबतही मार्गदर्शन केले जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दूरसंचार कंपन्यांनी यापूर्वीच दरवाढीचा निर्णय जाहीर केला असल्याने त्यांना ही वाढ किती असावी, हे निश्चित करण्याबाबत या घडीला काही सांगणे उचित ठरणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. प्रत्यक्षात दरवाढ लागू झाल्यानंतर काही दिवसांनी परिस्थिती लक्षात घेतली जाईल, असेही सांगण्यात आले.