धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सध्या १००% क्षमतेने भरलेले गिरणा धरण परिसरातील शेतीसाठी जीवनरेखा ठरू शकते, मात्र धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग नदीत वाया जाऊ न देता तो थेट पाटामार्गे शेतीसाठी वळवावा, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर व तालुका शाखेने केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने धरणगाव येथील पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत, तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले.
या निवेदन सादरीकरणावेळी शिवसेना उपनेते, रावेर लोकसभा मतदारसंघ व नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, धरणातून नदीत सोडले जाणारे पाणी थेट शेतीसाठी वापरले गेले पाहिजे. यासाठी दहीगाव बंधाऱ्यातून कॅनालद्वारे हे पाणी अमळनेर तालुक्यातील शेवटच्या चारीपर्यंत पोहोचवावे. त्यामुळे क्षेत्रातील विहिरींमध्ये पाणी पाझरून जलपातळी वाढण्यास मदत होईल आणि शेतीचा पोतही सुधारेल.

शिवसेनेच्या या आंदोलनामध्ये युवा सेनेचे जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहरप्रमुख भागवत चौधरी, उपजिल्हाप्रमुख हेमंत महाजन, शहर युवा प्रमुख लक्ष्मण महाजन, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील, समन्वयक संतोष सोनवणे, लीलाधर पाटील, रणजित सिंग शिखरवार, रमेश चव्हाण, सतीश बोरसे, किरण अग्निहोत्री, जगदीश मराठे, प्रेमराज चौधरी, जीभाऊ पाटील, प्रसिद्धी प्रमुख गजानन महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या अनेक भागांमध्ये समाधानकारक पावसाचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची स्थिती चिंताजनक आहे. अशा वेळी गिरणा धरणाचे पाणी जर शेतीसाठी वापरले गेले, तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थितीही सावरण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे प्रशासनाने या मागणीवर गांभीर्याने विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
शिवसेनेच्या या निवेदनामुळे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्यात आला असून, येत्या काळात या मागणीची दखल घेत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



