जळगाव प्रतिनिधी । उद्योजक अनिल बोरोले यांच्या अपघाती मृत्यूला महापालिका प्रशासन, संबंधीत ठेकेदार आणि अधिकारी दोषी असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे.
याबाबत वृत्त असे की, विख्यात उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल श्रीधर बोरोले यांचे शनिवारी सायंकाळी शहरातील चित्रा चौकात अपघाती निधन झाले. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल जाऊन रस्त्यावर पडल्यामुळे बोरोले यांना प्राणाला मुकावे लागले. यामुळे महापालिका प्रशासनाविरूध्द प्रचंड रोष व्यक्त होत आहे. या अनुषंगाने माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांना पत्र लिहले आहे. यात म्हटले आहे की, अनिल बोरोले यांच्या मृत्यूसाठी हा रस्ता तयार करणारा ठेकेदार आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी असणारे अधिकारी कारणीभूत आहेत. यामुळे त्यांच्यावर कलम ३०४-अ, ३३७, १६६-अ, १८८ आणि ३४ च्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. या प्रकरणी लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशी अपेक्षा दीपककुमार गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.