आरा गिरणी मशीनाचे बनावट स्वाक्षरीने नुतनीकरण; चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बेंडाळे चौकात सुर्या सॉ मिलच्या आरा गिरणी मशीन परवान्याच्या नुतणीकरणासाठी बनावट स्वाक्षरी तसेच जुनी स्वाक्षरी असलेल्या आधार कार्डची छायांकित प्रत जोडून वनविभागाकडून मशीनचे नुतणीकरण ५ डिसेंबर २०२३ रोजी करून घेण्यात आले. प्रकार समोर आल्याने या प्रकरणी मंगळवारी २ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता चार जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बेंडाळे चौकात सुर्या सॉ मिलच्या आरा गिरणी मशीनचे नुतणीकरण केलेले नव्हते. एक वेळा सॉ मिलसमोरील रस्त्यावरून जात असताना ॲड. पियूष नरेंद्र पाटील (वय-२७, रा. दीक्षितवाडी) यांना आरा गिरणी मशीन सुरू असल्याचे दिसले. आपण नुतणीकरणासाठी कोणताही अर्ज दिला नसताना मशील सुरू कशी म्हणून त्यांनी माहिती घेतली. त्यात आरा गिरणी तपासणी अहवालावर ५ डिसेंबर २०२३ रोजी त्यांची बनावट स्वाक्षरी व त्यासोबत जुनी स्वाक्षरी असलेल्या आधार कार्डची छायांकित प्रत आढळून आली.

हे बनावट दस्ताऐवज जळगाव येथील वन परिक्षेत्र अधिकारी यांना सादर करून परवाना नुतणीकरण केल्याचे आढळले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ॲड. पियुष नरेंद्र पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मंगळवार २ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता विजय भास्करराव पाटील, मनोज भास्करराव पाटील, संजय भास्करराव पाटील, सुहास वसंत चौधरी (सर्व रा. दीक्षितवाडी) या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनिल मोरे करीत आहेत.

Protected Content