जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘रक्तदान ही जीवनदान’ या सुभाषिताचा प्रत्यय आपणास ‘रेडक्रॉस’ चे रक्तदान व रक्त संकलनाचे कार्य पाहून येतो. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जळगाव शाखेने २००७ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत २२ हजार ९२७ थॅलेसीमिया रूग्णांना मोफत रक्त पुरवठा करत जीवनदान देण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. याशिवाय २००७ ते मार्च २०२३ पर्यंत २४ लाख ८४ हजार ४१५ पिशव्यांचे रक्त संकलन करत गरजू रूग्णांना रक्तपुरवठा करण्याचे काम रेडक्रॉस सोसायटी मार्फत करण्यात आले आहे.
इंडियन रेडक्रॉस सोसायटी ही एका राज्यासाठी किंवा देशासाठी काम करणारी संस्था नसून जगातील १८७ देशांमध्ये सेवा कार्य करत आहे. रेडक्रॉस सोसायटी म्हणजे मानवतावादी सेवाभावी दृष्टिकोनातून कार्य करणारी संस्था, रक्तपेढी चालविण्यासोबत इतर कार्यातही अग्रेसर आहे. या सर्व कामात संस्थेचे मागील काही वर्षात रूप बदलले आहे. अगदी इमारतीपासून ते इमारतींमधील नवतंत्रज्ञानाच्या मशिनरीपर्यंत सारे काही अद्ययावत झाले आहे.
रेडक्रॉस जळगाव शाखेकडून रक्तपेढीच्या कामाबरोबर गरजूंना मदतीचा हात, आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार व प्रशिक्षण, दीर्घायू दवाखाना, जेनरिक मेडिसीन स्टोअर्स, विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीचे काम करण्यात येत आहे. शहरातील तीन दवाखाने व फिरत्या रूग्णालयामार्फत रेडक्रॉस सोसायटीने आतापर्यंत ५० हजार रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली आहे. ई सेतू व आधार सुविधा केंद्राच्या माध्यमातून २५ हजारांपेक्षा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे काढण्यात आली आहेत.
कोरोना काळात उल्लेखनीय कार्य
रेडक्रॉस सोसायटीने कोरोना कार्यकाळात उल्लेखनीय अशी रूग्णसेवा दिली आहे. ८५ लाख रूग्णांना ‘आर्सेनिक एल्बम ३०’ च्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. दीड लाख नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. १० हजारांहून अधिक रूग्णांसाठी मोफत रूग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
अद्ययावत मशिनरी
रूग्णांना अधिक रक्त देण्यावर रेडक्रॉस रक्तपेढीचा भर आहे. यासाठी अद्ययावत नवतंत्रज्ञानाच्या मशिनरी यासाठी उपलब्ध आहेत. एलायझा टेस्ट, ल्युको रिडक्शन आणि नॅट टेस्टेड या तीन अद्ययावत मशिनरींमुळे अधिक सुरक्षित रक्त देण्याची हमी रक्तपेढी तर्फे देण्यात येत आहे.
पंधरा हजार दिव्यांगांना मदत
रेडक्रॉस मार्फत चालविण्यात येणाऱ्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत जिल्ह्यातील पंधरा हजारांहून अधिक दिव्यांगांना सहायक साधने, आरोग्य तपासणी व आर्थिक मदतीचा लाभ देण्यात आला आहे.
‘सेवा, स्नेह व समर्पण’ या ब्रीद वाक्याला साजेसे सेवाभावी काम रेडक्रॉस जिल्ह्यात करत आहे. सध्या इंडियन रेडक्रॉस जळगाव शाखा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद काम पाहत आहेत. तर मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोरराजे निंबाळकर आहेत. उपाध्यक्ष पदावर गनी अब्दुल मजीद मेमन, चेअरमन पदी विनोद लक्ष्मीनारायण बियाणी, डॉ. प्रसन्नकुमार चंपालाल रेदासनी काम करत आहेत. कोषाध्यक्ष पदी भालचंद्र प्रभाकर पाटील कार्यरत आहेत. कार्यकारिणी मंडळात अध्यक्षांसह एकूण १७ जण काम करत आहेत. आगामी काळात समाजातील विविध घटकांसाठी जलद व तत्पर सेवेच्या माध्यमातून रेडक्रॉस सोसायटी अधिक कात टाकणार असल्याचा मानस ही पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.