पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वरखेडी येथील गुरांच्या आठवडे बाजारात विक्रमी उलाढाल झाल्याची माहिती पाचोरा बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांनी दिली आहे.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती अधिपत्याखाली वरखेडी येथे आठवड्याच्या प्रत्येक गुरूवारी गुरांचा बाजार भरविण्यात येतो. यात राज्यभरातून गुरे खरेदी – विक्रीसाठी आणली जातात. लाखो रूपयांच्या उलाढालीतून बर्यापैकी उत्पादन पाचोरा बाजार समितीस प्राप्त होत असते. वरखेडी येथील गुरांच्या बाजाराचे उत्पादन नविन संचालक मंडळ येण्यापूर्वी कमी प्रमाणात उत्पन्न येत असल्याची माहिती प्राप्त होताच पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा बाजार समितीचे सभापती प्रा. गणेश पाटील, उपसभापती पी. ए. पाटील यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळाने योग्य नियोजन करून वैयक्तिक गुरांच्या खरेदी – विक्री व्यवहारावर लक्ष केंद्रीत केले.
या अनुषंगाने योग्य त्या सुचना बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरूडे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत योग्य नियोजन करून त्यांना बाजार समितीचे उत्पादन वाढीसाठी योग्य त्या सुचना दिल्या. तसेच स्वत: सभापती – उपसभापती व संचालक मंडळाने प्रत्यक्ष भेट देखील दिली. याचे फलश्रृत म्हणून २२ जून गुरूवार रोजी बाजार समितीच्या उत्पादनात चक्क १ लाख १८ हजार १८० एवढे उत्पन्न प्राप्त झाले.
यासंदर्भात बाजार समितीचे सभापती प्रा. गणेश पाटील यांनी मागील व चालू उत्पादनाबाबत अधिक माहिती देतांना सांगितले की, २५ मे २०२३ रोजी ६२ हजार ४११ रूपये, १ जून रोजी ७८ हजार ७५० रुपये, ८ जून रोजी ७५ हजार ८५२ रूपये, १५ जून रोजी ८१ हजार ३११ रूपये असे उत्पादन गेल्या ४ गुरूवारचे होते. तर नुतन संचालक मंडळाने उत्पादना संदर्भात लक्ष केंद्रीत करताच अवघ्या एकाच दिवसात म्हणजे २२ जुन रोजी १ लाख १८ हजार १८० रूपये एवढे उत्पन्न प्राप्त झाल्याचे सभापती प्रा. गणेश पाटील यांनी सांगितले.
भविष्यात उत्पन्न वाढीच्या दृष्टीने अशीच वाटचाल सुरू राहणार असून बाजारात येणार्या गुरांसाठी शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गुरे विक्रीसाठी बाजारात येणार्या घटकांसाठी विविध सोई – सुविधा, गाड्यांची पार्कींगसह इतर संपूर्ण सोयी – सुविधा देखील पुरविण्याचा मानस असल्याचे बाजार समितीचे सभापती प्रा. गणेश पाटील यांनी सांगितले आहे.