सिडनी – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । ऑस्ट्रेलियन युवा क्रिकेटपटू हरजस सिंहनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशक्य वाटणारा पराक्रम गाजवत क्रिकेटविश्वात खळबळ उडवून दिली आहे. न्यू साउथ वेल्स प्रीमियर क्रिकेट स्पर्धेत वेस्टर्न सबर्ब्सकडून खेळताना त्याने 141 चेंडूंमध्ये 314 धावा फटकावत त्रिशतक ठोकलं. या खेळीनं त्याचं नाव क्रिकेटच्या भविष्यातील सुपरस्टारमध्ये अग्रेसर ठेवलं आहे.

फक्त 20 वर्षीय हरजस सिंह शनिवारी दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सिडनी संघाविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. त्याची सुरुवात संयमित होती. पण एकदा का तो स्थिर झाला, की त्यानं गोलंदाजांवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. त्याच्या खेळीत तब्बल 35 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश होता. म्हणजेच, 258 धावा केवळ सीमारेषेबाहेरच्या फटक्यांवर केल्या.

त्याने 33 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं, आणि 74 चेंडूंमध्ये शतक. पण त्याचं दुसरं शतक केवळ 29 चेंडूत झळकलं. यानंतर त्याच्या फलंदाजीनं गती घेतली आणि तो अक्षरशः एका बाजूनं सिडनीच्या गोलंदाजीवर तुटून पडला. शेवटच्या षटकात तो 314 धावांवर बाद झाला, पण तोपर्यंत वेस्टर्न सबर्ब्सची धावसंख्या 483 वर पोहोचली होती.
हरजस सिंहनं ही ऐतिहासिक खेळी निकोलस कटलर आणि जोशुआ क्लार्कसोबत छोटेखानी भागीदारीनंतर खेळली. सामन्यानंतर हरजसनं दिलेल्या प्रतिक्रिया देखील मन जिंकणाऱ्या होत्या. तो म्हणाला, “मी फक्त शतक झळकावण्यात खूश होतो. मी माझ्या आईला विचारलं होतं, ‘जर मी शतक केलं तर तू मला तुझी गाडी चालवू देशील का?’ आणि मी आज हे शतक केलं!”
हरजस सिंह हा ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघाचा सदस्य असून 2024 च्या विश्वचषकात त्यानं अंतिम फेरीत भारताविरुद्ध 55 धावांची खेळी केली होती. त्याच्या ताज्या खेळीनं त्याच्या कसोटी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीचा दरवाजा मोठ्या प्रमाणात उघडला आहे.
दुसरीकडे, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माच्या नावावर कायम आहे. त्याने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 264 धावा केल्या होत्या. रोहितनं त्या खेळीत 9 षटकार आणि 33 चौकार मारले होते. सध्या तो फक्त वनडे खेळत असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहलीसोबत त्याची संघात निवड झाली आहे, मात्र कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे.
हरजस सिंहच्या विक्रमी त्रिशतकानं जागतिक क्रिकेटमध्ये नवीन उंची गाठली असून, त्याचं हे वादळी प्रदर्शन भविष्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी एक नवा संकेत देत आहे.



