जळगाव (प्रतिनिधी) सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील आरोग्य विज्ञान प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या (नीट युजी-२०१९) शासन अनुदानित, खाजगी महाविद्यालयाच्या जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक गुणवत्ता यादीनुसार समुपदेशन व कागदपत्र पडताळणी प्रक्रिया दिनांक २९ जुन ते ४ जुलै २०१९ या कालावधीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव या केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.
याबाबतची अधिसूचना आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, यांचे अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झाली केले आहे. याकरिता ना. महाजन यांनी जिल्ह्यातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या सोईसाठी मोफत कौन्सिलींग केंद्र सुरु करण्याचे सुचित केले होते. यापूर्वी जिल्ह्यातील पालक व विद्यार्थ्यांना समुपदेशन व कागदपत्रे पडताळणीसाठी औरंगाबाद येथे जावे लागायचे. या प्रश्नावर जिल्ह्यातील पालकांनी ना. महाजन यांचे याकडे लक्ष वेधले होते. त्यांच्या माध्यमातून सदर समुपदेशन व कागदपत्र पडताळणी प्रक्रिया केंद्रासाठी जळगाव वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळाली आहे.
सदर प्रक्रियेसाठी केंद्र अधिष्ठाता म्हणून डॉ. भास्कर खैरे, केंद्र प्रमुख म्हणून डॉ. किशोर इंगोले, प्राध्यापक व विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, केंद्र निरीक्षक म्हणून डॉ.सी डी. डांगे, सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांची नेमणूक करण्यात आली आहे.
तरी सर्व पालक व विद्यार्थी यांनी या समुपदेशन प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.