सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आला आहे. यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याची परिणिती म्हणजे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज केला आहे. यामुळे आघाडीपुढे ही बंडखोरी रोखायचे फार मोठे आव्हान आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. येथून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे. या मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केला होता. त्याबाबत झालेल्या चर्चेतून ठोस मार्ग निघाला नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी नाराजी पसरली होती. ही नाराजी रोखण्याचे मोठे आव्हान सध्या पक्षापुढे निर्माण झाले आहे.