नवी दिल्ली वृत्तसंस्था । सैन्यदलाचा गणवेश बदलण्याची तयारी केंद्र सरकारने केली असून आज संसदीय समितीत याची चर्चा झाल्यानंतर राहूल गांधी याला विरोध दर्शवत वॉकआऊट केले.
संरक्षण विषयक संसदीय समितीचे अध्यक्ष जुएल ओरम यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीला लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यासह अनेक वरिष्ठ सैन्य अधिकारी उपस्थित होते. लष्कर, हवाई दल आणि नौदलातील जवानांसाठी नव्या स्टाईलचा ड्रेस देण्याबाबतची चर्चा यावेळी करण्यात आली. त्यावेळी भाजपच्या एका खासदाराने अमेरिकन स्टाईलचे ड्रेस जवानांना देण्याची सूचना केली.
या सूचनेला राहुल गांधी यांनी तीव्र विरोध केला. आजच्या बैठकीला लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यासह अनेक वरिष्ठ सैन्य अधिकारी बसले आहेत. त्यामुळे सुरक्षा दलांच्या जवानांचा ड्रेस कसा असावा? याचा निर्णय त्या त्या दलाच्या प्रमुखांनी घेतला पाहिजे. सुरक्षा दल आणि त्यांच्या युनिटला गौरवाची मोठी परंपरा आहे, त्यामुळे त्यांनाच हा निर्णय घेऊ द्यावा, अशी सूचना राहुल गांधी यांनी केली.
बैठकीत बसलेले आपण सर्वजण राजकारणी आहोत आणि सुरक्षा दलाचा ड्रेस किंवा बॅचचा निर्णय घेण्याचा आपला अधिकार नाही. हा निर्णय सुरक्षा दलावरच सोपवण्यात यावा, असंही राहुल यांनी सांगितलं. पण ओरम यांनी राहुल गांधी यांना बोलण्यापासून मज्जाव केला. यामुळे राहुल गांधींनी अध्यक्षांच्या या भूमिकेला विरोध करून बैठकीतून सभात्याग केला. राहुल गांधी यांच्यानंतर समितीतील काँग्रेसचे सदस्य राजीव सातव आणि रेवंथ रेड्डी यांनीही वॉकआऊट करत आपला विरोध दर्शविला.