जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाचन मनुष्याला समृद्ध करते. वाचनामुळे वैचारिक प्रगल्भता मिळते. वाचण्याची सवय असेल तर ही सवय मनुष्याचा व्यक्तिमत्व विकास करते. त्यामुळे प्रत्येकाने वृत्तपत्रांसह इतर पुस्तकांचे वाचन नियमित केले पाहिजे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मध्यवर्ती ग्रंथालय विभागातर्फे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती तसेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे मंचावर उपस्थित होते. प्रथम ग्रंथालयातील २५ क्षमता असलेल्या इंटरनेट कक्षाचे अधिष्ठाता डॉ.रामानंद यांनी फीत कापून उदघाटन केले. त्यानंतर त्यांनी संगणकीय प्रणालीची तपासणी केली.
यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. सुरुवातीला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त विक्रेता दिनेश ठाकूर यांचा सन्मान अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी यांनी “वाचन समृद्धी, सुख समृद्धी” याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. वाचन कसे करावे, वाचनातून लेखनाची किमया कशी साधावी, वाचनाचे फायदे आदींविषयी सविस्तर माहिती दिली.
यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी, “वाचनाची आवश्यकता कशासाठी” याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले कि, विविध प्रांतांना, भाषा-शब्दांना जाणून घेण्यासाठी तसेच कुणाच्या आत्मचरित्रातून प्रेरणादायी संदेश मिळविण्यासाठी वाचनाची आवश्यकता आहे. वाचन वृत्तपत्रांपासून पुस्तकांपर्यंत सर्वांचे करता येते. वाचन नसल्यामुळे अनेकांना विविध ठिकाणी अडचणी येतात, असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन व आभार महाविद्यालयातील पॉझिटिव्ह इंडिया मासिकाचे संपादक विद्यार्थी प्रद्युमन होगे याने केले. ग्रंथालय सहायक अविनाश मोरे, सहायक ग्रंथपाल प्रमोद वानखेडे आदींनी परिश्रम घेतले.