जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान संचलित वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आणि ‘वाचन प्रेरणा दिन’ नुकताच अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की, “डॉ. कलाम यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात आलेल्या अनेक अपयशांना न डगमगता, नव्याने प्रयत्न करून यशाची सर्वोच्च शिखरे गाठली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून अपयश आले तरी खचून न जाता, पुन्हा प्रयत्न करण्याची जिद्द आत्मसात करावी.” तसेच, डॉ. कलाम यांच्या यशामध्ये वाचनाचे असलेले अजोड महत्त्व त्यांनी प्रभावीपणे पटवून दिले.

वाचनाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये वाढावी आणि डॉ. कलाम यांचे चरित्र त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहावे, यासाठी ग्रंथालय विभागाने ‘मला आवडलेले पुस्तक’ या विषयावर पुस्तक परीक्षण स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. डॉ. कलाम यांच्या आत्मचरित्र व अन्य पुस्तकांवर आधारित परीक्षणातून उत्कृष्ठ परीक्षणाची निवड करण्यात आली.
यात खुशबू कैलास पाटील हिने प्रथम क्रमांक, रिया तडवी हिने द्वितीय क्रमांक आणि खुशबू सैनी हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व विजेत्यांचा सत्कार प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. हितेश ब्रिजवासी यांनी केले, तर श्री. ईश्वर सावळे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.



