जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । हजारो वर्षे लोटली तरी, गीताज्ञानाची महती, उत्सुकता, महत्त्व कमी होताना दिसत नाही. कलियुगातही गीता तितकीच महत्त्वाची असल्याचे दिसून येते. सुखी आणि आनंदी जीवनासाठी गीतेतील काही उपदेश अत्यंत उपयुक्त आहेत असे मत सिंगापूर येथील व जगभरात श्रीमद भगवतगीतेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या जान्हवी देवी दासी यांनी व्यक्त केले.
रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयातील बिजनेस मॅनेजमेट विभागांतर्गत “लाईफ लेसन फ्रॉम भगवतगीता” या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंगापूर येथील जान्हवी देवी दासी, रायसोनी बिजनेस मॅनेजमेटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, बुक रिव्हू क्लबच्या समन्वयिका प्रा. ज्योती जाखेटे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात जान्हवी देवी दासी पुढे म्हणाल्या कि, भारतीय तत्त्वज्ञान हे कालातीत आहे. देशात अनेक धर्म, जाती, पंथाचे नागरिक अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. प्रत्येक धर्मात सांगितलेले तत्त्वज्ञान अतिशय मोलाचे असल्याचे पाहायला मिळते.
भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अगदी कानाकोपऱ्यातून संशोधक, अभ्यासक, विचारवंत देशात येत असतात. देशातील अनेक प्रमुख ग्रंथांमध्ये वरचे स्थान असलेला ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. गीतेतील शिकवण ही कालातीत असून, आजच्या काळातही गीताज्ञान किती अमोघ, अनमोल आणि अमूल्य वाटते, याची प्रचिती अनेकांना येत असते. तसेच कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ या उपदेशाचा भावार्थ असा कि तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे. त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको; (पण) कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको तसेच मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रीत करावे. वर्तमानात मेहनत, परिश्रम घेतले, तरच भविष्यात सुफलप्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते, असे सांगितले जाते.
तसेच यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति । शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः॥ या उपदेशाचा भावार्थ असा होतो कि, मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही. तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्मांचा त्याग करतो. तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे. एखादे कार्य मनाप्रमाणे पार पडल्यानंतर अति आनंदीत होता कामा नये. अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते. तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्ष्याही करू नये. मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.