यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने यावल येथे आयोजित बैठकीत आगामी निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत शिवसेना उपनेते आणि लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
बैठकीत बोलताना गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येणार आहेत. वरिष्ठ नेत्यांकडून येणाऱ्या आदेशांनुसार यावल तालुक्यातील सर्वच निवडणुकांबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तोपर्यंत सर्व शिवसैनिकांनी आपल्या प्रभागातील नागरी समस्या ओळखून त्यावर काम सुरू करावे आणि जनतेशी थेट संपर्क साधून लोकाभिमुख कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत यावल नगरपालिकेत शिवसेनेच्या सौ. सुरेखा कोळी यांनी नगराध्यक्षपद मिळवून यशाची परंपरा निर्माण केली होती. त्यामुळे या वेळी देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना हीच जागा जिंकून दाखवेल, असा आत्मविश्वास शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांनी व्यक्त केला. त्यांनी नगराध्यक्षपदावर पुन्हा दावा देखील जाहीरपणे मांडला.
बैठकीदरम्यान तालुका प्रमुखपदी शरद कोळी यांची आणि फैजपूर शहर प्रमुखपदी संदीप माळी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या दोघांचा या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावल शहर व तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत बोलताना गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी जुन्या आणि अनुभवी शिवसैनिकांशी संवाद साधावा, त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा आणि स्थानिक पातळीवर पक्षाचे जनाधार अधिक मजबूत करावा. “जनतेत जा, त्यांच्या समस्या समजून घ्या, त्यांचे प्रश्न सोडवा – त्यामुळे शिवसेना अधिक बळकट होईल आणि विजय निश्चित होईल,” असे ते म्हणाले.
बैठकीचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विजयासाठी सज्ज असल्याचा निर्धार व्यक्त केला.



