जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रायसोनी नगरात एलआयसी कार्यालयातील शाखा प्रबंधकाचे बंद घर फोडून सोन्याचे दागिन्यासह १ लाख ५२ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रकाश भिमरावजी बांगर (वय-५३) रा. जे.के. इंग्लिश मेडीयम, रायसोनी नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. भास्कर मार्केटमधील एलआयसी कार्यालयात वरीष्ठ शाखा प्रबंधक म्हणून नोकरीला आहेत. १४ एप्रिल रोजी दुपारी ते पत्नी, मुलगा व सुन यांच्यासह नागपूर येथील त्यांच्या घरी गेले. रविवारी २४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता ते जळगावातील रायसोनी नगरातील घरी परतले असता त्यांच्या घराचे दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी घरात पाहणी केली असता सामान अस्तव्यस्त दिसून आला. अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने यात चैन, अंगठी, मंगळसूत्र, कानाले टॉप्स, नथ व चांदीचे पैजन असा एकुण १ लाख ५२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. सोमवारी २५ एप्रिल रोजी रामानंदनगर पोलीसात त्यांनी धाव घेवून चोरी झाल्याची माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.