रावेर (प्रतिनिधी) येथील शैक्षणिक संस्थेची गुणवत्ता वाढवून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात जावू लागू नये म्हणून त्यांच्या भविष्याच्या गरजा भागविणारे शिक्षण याच ठिकाणी उपलब्ध करवून देत रावेर शहर भविष्यात शैक्षणिक हब म्हणून ओळखले जावे, अशी मनोकामना आनंद शैक्षणिक तांत्रिक व बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष तथा श्रीराम फौंडेशन अध्यक्ष आणि श्रीराम उद्योग समुहाचे संचालक श्रीराम पाटील यांनी व्यक्त केली. त्यांनी या वर्षापासून अकरा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले असल्याची माहिती रावेर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नुकतीच दिली.
रावेर येथील मॅक्रो विजन अकादमी या शाळेत आयोजित पत्रकार परिषदेत श्रीराम पाटील यांच्यासह संचालक स्वप्नील पाटील, प्रवीण पाचपोहे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात व्यवस्थापक किरब दुबे यांनी माहिती देताना शाळेमधील विविध उपक्रम आणि सुविधा यांची माहिती दिली. तर प्राचार्या कविता शर्मा यांनी शालेय शैक्षणिक सुविधा आगामी प्रकल्प याबाबत सविस्तर माहिती देत पालकांचा विश्वास आणि साथ कौतुकास्पद असल्याचे देखील सांगितले. श्रीराम पाटील यांनी माहिती देतांना सांगितले की, रावेर शहरात शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून सन २००६ मध्ये इंग्रजी माध्यमाची सीबीएसई शाळा सुरु करण्यात आली. एप्रिल २०१८ पासून श्रीराम पाटील यांनी सदर शाळा चालविण्याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारली असून वर्षभरात या ठिकाणी अनेक महत्वाचे बदल झाले आहेत. विद्यार्थांसाठी १७ बसेस आणि इतर लहान वाहने उपलब्ध करून दिली. तर लवकरच चार बसेस घेण्यात येणार आहेत. सर्व बसेस आर.टी.ओ मानांकनानुसार मान्यता मिळविलेल्या आहेत. शाळेत नर्सरी ते बारावी पर्यंत सुविधा असून अद्ययावत प्रयोगशाळा, सकस आहार पुरविणारी भोजन व्यवस्था, अंतर आणि मैदानी खेळ, सामान्य ज्ञान वाढविणारी शिक्षण पद्धत आणि अत्याधुनिक क्लासरूम आदी अनेक सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत.
सन २०१९ – २० या शैक्षणिक वर्षात वर्ग पहिली ते अकरावी मधील आर्थिक दृष्ट्या अक्षम असलेल्या अकरा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व आम्ही स्वीकारत असून वाहव व्यवस्था आणि भोजन व्यवस्थेत देखील पन्नास टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे श्री.पाटील यांनी जाहीर केले. शैक्षणिक व्यवस्थेत पालकांच्या सूचना असल्यास त्यांचा आदर करून त्या राबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले. तसेच शिकवणी मुक्त शिक्षण देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. यावेळी सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले. तर आभार स्वप्नील पाटील यांनी मानले.