रावेर/यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर आणि यावल तालुक्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘जलव्यवस्थापन कृषी पंधरवाडा २०२५’ अंतर्गत या दोन्ही तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या न्हावी-बोरखेडा पाणलोट क्षेत्रात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या महत्वाकांक्षी कामांना प्रारंभ झाला आहे. या उपक्रमामुळे या भागातील भूजल पातळीत वाढ होऊन दुष्काळाच्या संकटावर मात करण्यास मदत होणार आहे.


या कामाची सुरुवात न्हावी-बोरखेडा पाणलोट क्षेत्रातील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामातून झाली. आमदार अमोल जावळे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकारत आहे.
१९९९ च्या केंद्रीय भूजल यंत्रणेच्या अहवालानुसार रावेर, यावल आणि चोपडा तालुका ‘अतिशोषित क्षेत्र’ म्हणून घोषित झाले आहेत, जिथे दरवर्षी भूजल पातळी १ मीटरने घटत आहे. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बझाडा झोनमधील नैसर्गिक भूजल पुनर्भरणाच्या क्षमतेचा वापर केला जाणार आहे.
या प्रकल्पात पाझर तलाव, नाले आणि बंधाऱ्यांमधील गाळ काढून त्यांचे खोलीकरण व रुंदीकरण केले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठण्यास मदत होईल आणि पावसाळ्यातील कोट्यवधी लिटर पाणी जमिनीत मुरेल, परिणामी भूजल पातळी स्थिर आणि सुदृढ होईल. माजी खासदार स्व. हरिभाऊ जावळे यांच्या ‘थेंब अमृता’ संकल्पनेतून यापूर्वीही याच पद्धतीने नद्यांमधील गाळ काढण्याचे काम यशस्वी झाले होते.
मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा संधारण अधिकारी (जि. प.) जळगाव आणि नाम फाउंडेशन यांच्या सहकार्याने रावेर-यावल तालुक्यात सुमारे ५० जलसंधारण कामे पूर्ण केली जाणार आहेत. यातून अंदाजे दोन लाख घनमीटर गाळ काढला जाईल, ज्यामुळे जलसाठ्यात मोठी वाढ होईल. याचा थेट फायदा यावल-रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे, कारण भूजल पातळी वाढल्याने उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई कमी होईल, केळीचे उत्पादन वाढेल आणि वीज वापरात बचत होऊन लोडशेडिंगची समस्याही कमी होण्यास मदत होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या सूचनेनुसार हे महत्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळत आहे.
या कामांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. एस. ढंगारे, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी काकडे आणि सेवानिवृत्त उपअभियंता के. पी. पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. यावेळी जलसंधारण अधिकारी विसपुते, पी. के. माळोदे, स्थानिक सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


