जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील मेहरूण तलावाजवळ बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल खरेदी व विक्री करणाऱ्या दोघांवर एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी २६ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता करवाई केली आहे. याप्रकरणी रात्री १०.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या शिरसोली रोडवरील मेहरूण तलावाजवळ काही तरूण हे बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस यांची खरेदी आणि विक्री होत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी शनिवारी २६ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता कारवाई केली. यावेळी पोलीसांनी संशयित आरोपी मुदस्सीर नझर सलीम परवेझ शेख उर्फ साहील मुद्दा वय २४ रा. तांबापूरा आणि नदीम खान साबीर खान उर्फ गोल्डन रा.चाळीसगाव या दोघांमध्ये गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस यांची खरेदी विक्री करतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल,५ जिवंत काडतूस आणि मोटारसायकल असा एकुण २ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोहेकॉ हरीलाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मुदस्सीर नझर सलीम परवेझ शेख उर्फ साहील मुद्दा वय २४ रा. तांबापूरा आणि नदीम खान साबीर खान उर्फ गोल्डन रा.चाळीसगाव या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले हे करीत आहे.