रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पंचायत समितीच्या बहुचर्चीत शौचालय घोटाळा प्रकरणातील संशयितांनी आता पोलिसांकडे तब्बल ५० लाख रूपयांची रक्कम जमा केल्याची माहिती समोर आली आहे.
रावेर तालुक्यातील पंचायत समितीच्या अंतर्गत कोट्यवधी रूपयांचा शौचालय अनुदान घोटाळा झाला असून यात दलाल, कर्मचारी आणि लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अनेक बडे मासे देखील अडकणार असल्याची चर्चा मध्यंतरी सुरू असतांनाच आता एक नवीन माहिती समोर आली आहे.
शौचालय गैरव्यवहार प्रकरणी प्रकरणी रावेर पोलिसांनी बावीस आरोपीं कडून सुमारे पन्नास लाख रुपये जमा झाल्याची माहिती तपास अधिकारी शितल कुमार नाईक यांनी दिली आहे. दरम्यान, पुढील काही दिवसात हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची शक्यता देखील नाईक यांनी वर्तविली आहे. तर, अनुदानाची रक्कम ही पोलीस प्रशासनाकडे जमा करण्याचा पवित्रा संशयितांनी घेतल्यामुळे या प्रकरणी त्यांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे.