रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारमुळे तालुक्यातील बहुतेक धरणे पुर्णपणे भरली आहे. आता धरणे भरल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील सुकी धरण, मंगरुळ धरण, मात्राण धरण, आभोडा धरण शंभर टक्के भरले आहे. विशेष म्हणजे ही सर्व धरणे आज सकाळी पहाटच्या सुमारास भरली असून सर्व धरणांमधून दीड ते दोन फुटांवरुन ओवरफ्लोने पाणी वाहत आहे. रावेर तालुक्यासह आदिवासी भागात पावसाची संततधार काल रात्रीपासून सुरु आहे तर आदिवासी भागासहीत मध्य प्रदेशात देखील मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस झाल्याने अनेक नदी-नाले दुथळी भरून वाहत आहे. तर धरणे भरल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल. यामुळे शेतकरी चांगले केळीचे पिक घेतील असा विस्वास के-हाळा येथील सरपंच तथा शेतकरी राहुल पाटील यांनी सांगितले.
मागीलवर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा दुष्काळ जाहीर करावा लागला होता. विहिरीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड घट झाल्याने पाण्याअभावी हजारो हेक्टर केळी या परिसरातील शेतकऱ्यांनी सोडली होती. परंतु मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे रावेर परिसराचा दुष्काळ वाहून गेला आहे. म्हणून ओळख असलेल्या भोकर व सुकी नदी दुथळी भरून वाहत आहे.