पॉलिटीकल स्पेशल
रावेर शालीक महाजन । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांचे वर्चस्व असणार्या रावेर पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांची निवड प्रक्रिया लवकरच होणार आहे. नाथभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर या निवडीच्या माध्यमातून त्यांना आपली ताकद दाखवून देण्याची चांगली संधी यातून मिळणार आहे.
जिल्हातील सर्वाधिक राजकीयदृष्ट्या चर्चेला जाणारी रावेर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक होऊ घातली आहे. यात उपसभापतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिली असून सभापती देखील लवकरच देतील अशी शक्यता आहे. येथे भाजपाचे निर्विवाद वर्चस्व आहे.खडसे राष्ट्रवादीत गेल्या नंतर प्रथमच स्वगृहात मोठ्या संस्थेची निवडणूक होत असून भाजपाला रावेर पासुन सुरूंग लावण्याची नामी संधी माजी मंत्री खडसे यांच्या कडे आहे. तर भाजपाचाच सभापती करण्याची जबाबदारी खा रक्षा खडसे यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात खडसेच्या बालकिल्ला असलेला रावेर पंचायत समितीमध्ये कोणाचा सभापती बसतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रथमच महत्वाची निवड
माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश केल्या नंतर प्रथमच मोठी संस्था असलेली रावेर पंचायत समितीची सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक होऊ घातली आहे.आता पर्यंत तेथे माजी मंत्री खडसे सूचवतील त्यालाच सभापती उपसभापती पदाचा मान मिळाला आहे.येथे निवडुन आलेले बहुतेक भाजपा सदस्य हे खडसे गटाचे आहे. येथे भाजपाच सभापती उपसभापती व्हावा म्हणून स्वत: माजी मंत्री गिरीश महाजन व खासदार रक्षा खडसे यांचे लक्ष आहे.त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात माजी मंत्री खडसेंच्या रावेर या बालेकिल्यात भाजप पुन्हा बाजी मारणार की खडसे आपली ताकद दाखवून महाविकास आघाडीचा सभापती करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
असे आहे पक्षीय बलाबल
रावेर पंचायत समितीला भाजपाचे आठ सदस्य असून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे दोन शिवसेनाचे एक तर कॉग्रेस पक्षाचे एक पंचायत समिती सदस्य आहे. यापूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सुचने वरुन येथे माधुरी नेमाडे यांनी अडीच वर्ष सभापती पद भोगले तर सुमारे वर्षभरा पासुन जितेंद्र पाटील हे सभापती पदावर विराजमान होते. तर आता ठरल्या प्रमाणे कविता कोळी या भाजपा कडून सभापती होतील असा विश्वास भाजपाच्या खा रक्षा खडसे यांना आहे. सध्या रावेर पंचायत समिती बद्दल माजी मंत्री खडसेची यांनी रावेर पंचायत समितीमध्ये मागास वर्गीयांना संधी मिळण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळुन निघाले आहे.ठरल्या प्रमाणे अखेर काल उपसभापती जुम्मा तडवी यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच सभापतीही राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे. यानंतर येथे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.