रावेर (प्रतिनिधी) शहरासह परिसरात आज दुपारी मूसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील नागझिरी नदीला मोठा पुर आल्याने सुमारे एकतास वाहतूक बंद होती. शेतक-यांनी मात्र पावसामुळे आनंद व्यक्त केला आहे.
आज दुपारी ३.०० च्या सुमारास वातावरणात बदल होवून आभाळात ढग जमा होवून मूसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा तडाखा एवढा जोरदार होता की, अनेक वाहन चालकांना आपले वाहन रस्त्यावरच थांबवावे लागले. या पावसामुळे हतनुर धरणातील पाण्याच्या पातळीत मात्र वाढ होणार आहे.
पूराबाबत तहसिलदार अनभिज्ञ : शहरात भरवस्तीमधुन नागझिरी नदी वाहते, आज झालेल्या मुसळधार पावसामुळे या नदीला मोठा पुर आला होता. शहरातील सावदा रोडवर असलेल्या पूलाजवळ धोक्याची पातळी ओलांडून नदी वाहत होती, मात्र याबाबत तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी “फक्त पाऊस आला आहे, बाकी मला माहिती नाही” असे अजब उत्तर देऊन पूराबाबत अनभिज्ञता दाखवली.