रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेची निवडणूक अधिकृतपणे जाहीर झाली आहे. यातच राजकीय तापमान चढले आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक एक हा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. येथे भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि अपक्ष उमेदवार यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. मतदारसंघात आता पासूनच पैजा लागायला सुरुवात झाली असून, मतदार कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रावेर शहरातील प्रभाग क्रमांक एक हा माळी समाज बहुल मतदारसंघ आहे. मागील निवडणुकीत या प्रभागातून अपक्ष उमेदवार प्रल्हाद महाजन आणि शारदा चौधरी यांनी विजय मिळवला होता. मात्र, या वेळी दोघेही निवडणूक लढवण्याच्या इच्छेत नसल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आठ वर्षांनंतर होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत या प्रभागातून अनेक जण आपले राजकीय नशिब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

भाजपकडून या प्रभागातील ओबीसी पुरुष जागेसाठी माजी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, रविंद्र शिवाजी महाजन, ई. जे. महाजन सर, योगेश पंडीत महाजन, रविंद्र दिनकर पाटील आणि उमेश अरुण महाजन यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. तसेच नाथाभाऊ समर्थक ज्ञानेश्वर नत्थु महाजन देखील इच्छुकांच्या यादीत आहेत. दुसरीकडे, भाजपाला कडवे आव्हान देण्यासाठी शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष नितीन उर्फ बंटी महाजन हे रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे या प्रभागात सर्वात लक्षवेधी लढत होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
महिला जनरल जागेसाठी देखील स्पर्धा तितकीच रंगतदार आहे. भाजपकडून सरला रविंद्र पाटील, पद्माबाई वसंत पाटील, वंदना उमेश महाजन, अश्विनी रविंद्र महाजन आणि सपना योगेश महाजन यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना (उबाठा) कडून कुसुमबाई सुधाकर माळी आणि माधुरी किशोर महाजन या इच्छुक आहेत. अपक्ष म्हणून सुचिता निलेश महाजन यांनी निवडणुकीत उतरायचा निर्णय घेतला आहे.
या प्रभागात एकूण ३ हजार २८३ मतदार असून महात्मा फुले चौक, भगवती नगर, मरी माता मंदिर, नागझिरी आणि पोलीस चौकी परिसर यांचा समावेश आहे. माळी समाज बहुल या प्रभागात भाजपसमोर उमेदवार निश्चित करण्याचे मोठे आव्हान आहे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांची भूमिका काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आमचे प्रतिनिधी यांनी प्रभागातील फेरफटका मारला असता स्थानिक नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की, “आमची समस्या सोडवणाऱ्यांनाच आम्ही मत देऊ”. काही मतदारांनी विकासाचे व्हिजन असलेल्या उमेदवाराला संधी देण्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे या प्रभागात मतदारांचा मूड ओळखणे अवघड झाले असून, प्रत्येक गटाने विजयासाठी सर्वतोपरी तयारी सुरू केली आहे.



