रावेर, शालीक महाजन | जिल्हा बँकेच्या आज लागलेल्या निकालात रावेरात कॉंग्रेसच्या उमेदवाराने मिळविलेले अनपेक्षित यश हे केळी पट्टयातील आगामी राजकीय वार्यांची दिशा दर्शविणारे ठरले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार शिरीष चौधरी यांनी पक्की मोर्चेबांधणी करून माजी आमदार अरूणदादा पाटील आणि त्यांना पाठींबा देणार्या भाजपचे काम लावल्याने राजकीय वर्तुळ चकीत झाले आहे. सहकार आणि राजकारण याचा थेट संबंध नसला तरी राजकीय प्रभावाचे सहकारात प्रतिबिंब उमटत असल्याने या निकालाचा विधानसभा मतदारसंघातील आगामी राजकारणावर व्यापक परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलचे गुर्हाळ बरेच दिवस चालल्यानंतर महाविकास आघाडीने भाजपला वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचे स्पष्ट झाले. अर्थात, तोवर बराच उशीर झाला असल्याने भाजप खर्या अर्थाने रिंगणातच उतरू शकला नाही. यामुळे अधिकाराचा गैरवापर करत असल्याचे कारण देत, भाजपने आपल्या उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडले. अर्थात, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना कथितरित्या अर्ज मागे घेण्यासाठी वेळ न मिळाल्याचे कारण समोर आल्यानंतर पडद्याआड काही तरी शिजत असल्याचा वास आला. आणि हे खरोखरीच शिजत असल्याचे आजच्या निकालातून दिसून आले आहे. याबाबत आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून विविधांगी विश्लेषण आणि अचूक वार्तांकन जाणून घेतले आहे. आता आपण केळी पट्टा म्हणून ख्यात असणार्या यावल आणि रावेर तालुक्यातील रावेरच्या जागेबाबत विवेचन करूया.
रावेरात नाट्यमय घटना घडल्या. मराठा समाजातील सर्व मतदारांनी एकमुखाने माजी आमदार अरूणदादा पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र ही जागा कॉंग्रेसला सोडण्यात आल्याने अरूणदादांना सहकार पॅनलची उमेदवारी मिळाली नाही. यामुळे दुखावलेले अरूणदादा थेट आमदार गिरीश महाजन यांना भेटले. त्यांना भाजपने पुरस्कृत केले. भाजप पुरस्कृत असल्याने या पक्षाची हक्काची मते आणि समाजाची मते यांच्या शिदोरीवर अरूणदादा यांचा विजय निश्चीत मानला जात होता. यातच विरोधातील दोन्ही उमेदवार अनुक्रमे जनाबाई गोंडू महाजन आणि राजीव रघुनाथ पाटील यांनी त्यांना जाहीर पाठींबा देखील दिला. यामुळे अरूणदादांची बिनविरोध निवड निश्चीत झाली असून यावर फक्त अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी राहिले होते. राष्ट्रवादीचे नेते संजय पवार यांनी पत्रकार परिषदेच असेच जाहीर केले होते. मात्र पडद्याआड हालचाली गतीमान झाल्या. निवडणुकीआधीच्या काही दिवसांमध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार शिरीषदादा चौधरी अचूक व्यूहरचना करून अरूण पांडुरंग पाटील यांना एका मताने पराभूत करण्याची किमया केली. अरूणदादा हे सात्वीक स्वभावाचे सर्वमान्य नेते मानले जातात. त्यांचा हा पराभव हा जिव्हारी लागणारा आहे. याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेष करून बाजार समिती निवडणुकीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
या पराभवामुळे दुखावलेले अरूणदादा पाटील आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कदाचित ते पक्षांतर करून भाजपमध्ये घरवापसी करू शकतात. असे झाल्यास केळी पट्टयात भाजपला नवसंजीवनी मिळू शकते. तर पक्षातच राहून ते अंतर्गत विरोधक एकनाथराव खडसे यांच्या विरोधात खेळी करू शकतात. मात्र पुन्हा बलवान झालेले खडसे आणि आपली ताकद दाखवून दिल्याने उत्साह दुणावलेले आमदार शिरीषदादा चौधरी यांचा एकत्रीतपणे सामना करणे त्यांना शक्य होईल का ? याचे उत्तर आजच देता येणार नाही.
रावेर तालुक्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार शिरीष चौधरी यांनी एकत्रीतपणे केलेले मोर्चेबांधणी यशस्वी ठरल्याचे आज सिध्द झाले आहे. आमदार शिरीष चौधरी हे अगदी शांतपणे, कुणालाही सुगावा लागू न देता, मुरब्बीपणे काय करू शकतात हे देखील यातून अधोरेखीत झाले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून अरूणदादा जर भाजपमध्ये गेले तर या परिसरात पक्षाला थोडी बळकटी मिळू शकते. अन्यथा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या रेट्यापुढे भाजपला अनेक अडचणी येतील हे सांगण्यासाठी कुणा ज्योतीष्याची आवश्यकता नाही. रावेर तालुक्यातील केळीला अनेकदा चक्रीवादळाचा फटका बसतो. अगदी कुणालाही सुगावा न लागता क्षणार्धात होत्याचे नव्हते होऊन जाते. आज माजी आमदार अरूणदादा पाटील यांच्या सारख्या अतिशय तुल्यबळ असणार्या नेत्याचा झालेला पराभव हा केळी पट्टयातील राजकीय चक्रीवादळ मानावे लागणार आहे. यातूनच आगामी राजकीय घडामोडींची बिजारोपण झाल्याचे देखील विसरता येणार नाही.