रावेर-शालीक महाजन | जिल्हा बँक संचालिका जनाबाई गोंडू महाजन या अपात्र झाल्याने राजकीय आणि सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षाच्या अखेरीस अर्थात २१ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रावेर सोसायटी मतदारसंघातून धक्कादायक निकाल लागला होता. माजी आमदार अरूण पांडुरंग पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने आ. एकनाथराव खडसे यांच्या पॅनलतर्फे ऐन वेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोंडू महाजन यांच्या पत्नी जनाबाई गोंडू महाजन यांना उमेदवारी देण्यात आली होती. ही लढत अतिशय चुरशीची झाली. यात अरूण पाटील यांचा अवघ्या एक मताने पराभव करून जनाबाई महाजन या विजयी झाल्या होत्या.
दरम्यान, नियमानुसार निकाल लागल्यापासून ६० दिवसांच्या आत निवडणुकीचा खर्च दाखविणे आवश्यक होते. तथापि, अंतीम मुदत उलटून गेल्यानंतर देखील त्यांनी खर्चाचे विवरण दाखल केले नव्हते. या संदर्भात मंदार पाटील यांनी माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती घेऊन यांनी सहकार खात्याकडे दाद मागितली होती. या अनुषंगाने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था विलास गावडे यांनी जनाबाई गोंडू महाजन यांना अपात्र ठरविले आहे.
आज मंदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती जाहीर केली आहे. यामुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. या पत्रकार परीषदला राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी, कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, सूर्यभान चौधरी, कॉग्रेस शहरध्यक्ष संतोष पाटील, नितिन पाटील आदींची उपस्थिती होती.