रावेर हनीट्रॅप प्रकरण : आरोपी महिलेसह मुलाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर हनीट्रॅप प्रकरणात अटकेत असलेल्या महिलेला आणि तिच्या मुलाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शहरातील एका प्रतिष्ठित धनाढ्य व्यक्तीला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा हा प्रकार उघडकीस आला होता.

माहितीनुसार, सात-आठ वर्षांपासून संबंधित महिला आणि पीडित व्यक्तीचे संबंध होते. महिलेने त्याच्या खासगी क्षणांचे गुप्त चित्रीकरण करून वेळोवेळी पैशांची मागणी केली. अखेर, हा “पारसमणीचा” खेळ संपला असून, आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. दोघेही मागील चार दिवसांपासून पोलिस कोठडीत होते. आज पुन्हा दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत. पोलिसांच्या तपासानुसार, या हनीट्रॅप प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, प्रतिष्ठित लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या कारवाईकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

 

Protected Content