रावेर प्रतिनिधी | नकली नोटांच्या रॅकेट प्रकरणी मुख्य संशयितासह या नोटांना चलनात वापरण्याचा प्रयत्न करणार्या रावेर येथील पाच जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
याबाबत वृत्त असे की, मध्यप्रदेशातील नकली नोटांच्या रॅकेटचे धागेदोरे हे रावेरशी जुळले असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वीच समोर आली होती. एमपीमध्ये एकाला अटक करण्यात आल्यानंतर याबाबती माहिती रावेर पोलिसांना मिळाली होती. यामुळे मध्यप्रदेशातून संबंधीत आरोपीची चौकशी करण्यात आली. यानंतर त्याच्यासह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात आज पहाटे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रावेर येथील शेख शाकीर शेख हाफीज याने मध्यप्रदेशातून सात हजार रूपयांच्या १०० आणि २०० रूपयांच्या बनावट नोटा रावेरात आणल्या होत्या. त्याने या नोटा असलम उर्फ राजू सुपडू तडवी (वय ३० राहणार पाच बीबी टेकडी रावेर) ;सोनू मदन हरदे (वय ३० राहणारा अफुल्ली रावेर); रविंद्र राजाराम प्रजापति (वय ३१ राहणार कुंभार वाडा रावेर) आणि शेख शाकीर शेख साबीर (वय २६ राहणार खाटीक वाडा रावेर) यांना वापरण्यासाठी दिल्या होत्या.
यातील शेख शाकीर शेख हाफीज याला मध्यप्रदेशात हरदा येथून अटक करण्यात आली असून त्याचे हस्तांतरण करण्यात आले आहे. त्याची चौकशी केल्यानंतर वरील चारही जणांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल सचिन रघुनाथ घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस स्थानकात भादंवि कलम ४८९, (ब),४८९(क), ३४ प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार /२३६० शेख गफुर शेख कादर व पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे हे करत आहेत.