रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रात्रीच्या सुमारास भोकर नदीपात्रातुन अवैध वाळू व गौणखनिज उत्खनन रोखण्यासाठी गेलेले प्रोबेशनरी तहसीलदारांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पातोंडी शिवारात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू उत्खनन सुरू असून वाळू तस्कर आता थेट प्रशासकीय अधिकार्यांवर हल्ला करण्याइतके मुजोर झाले आहेत. रावेर तालुक्यात अशीच एक घटना घडली असून या प्रकरणी प्रशिक्षणार्थी अर्थात प्रोबेशनरी तहसीलदार मयूर कळसे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या संदर्भात मयूर कळसे यांनी रावेर पोलिसा दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. दि ११ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मंडळ अधिकारी जनार्दन बंगाळे, यासिन तडवी, विठोबा पाटील, गजेंद्र शेलकर व कोतवाल प्रविण धनके या आपल्या सहकार्यांसह ते वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी पातोंडी शिवारातील नदीपात्रात गेले होते. याप्रसंगी अवैध गौण खनिज उपसा व वाहतुक करणारे एमएच १९ डीव्ही ३७३९ क्रमांकाचे जेसीबी तसेच एक एमएच १९ ईए १३११ क्रमांकाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर तसेच ट्रॉलीसह व एक स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह विना क्रमांकाचे अवैध वाळु ने भरलेले वाहन यांच्यावर जप्तीची कारवाई त्यांनी सुरू केली.
दरम्यान, ही कारवाई सुरू असतांना मोहन बोरसे याला महसूलच्या पथकाने त्याचे जेसीबी हे तहसील कार्यालयात नेण्याचे सांगण्यात आले. मात्र त्याने सुरू केलेले जेसीबी हे मयूर कळसे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तथापि, ते सतर्क असल्याने बाजूला झाल्यामुळे अनर्थ टळला. तर तो भरधाव वेगाने जेसीबी घेऊन पळून गेला. तसेच यासोबत एक ट्रॅक्टरचा चालक देखील आपले वाहन घेऊन पळून गेला.
दरम्यान, मनोज दशरथ बोरसे याने विना क्रमांकाचे ट्रॅक्टर वाळूने भरलेले कारवाईसाठी तहसिल कार्यालय रावेर येथे घेऊन येत असताना पातोंडी गावाजवळ ट्रॅक्टर जोरात घेऊन खिरवड गावाच्या दिशेने घेऊन गेला त्यास विठोबा पाटील यांनी त्यांची गाडी तिरपी करुन थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु तो न थांबता त्यांचे वाहनाला कट मारुन जोरात घेऊन गेला. ट्रॅक्टर वर बसलेले गजेंद्र शेलकर यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने धक्काबुक्की करुन त्यांचा चष्मा फोडुन नुकसान करुन मोबाईल खाली पाडला व त्यांना ट्रॅक्टरवरुन खाली ढकलुन पळुन गेला.
या अनुषंगाने मयूर कळसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहन बोरसे व मनोज बोरसे दोन्ही रा. पातोंडी ता. रावेर व त्यांचे सोबत असलेले ८ ते ९ इतर व्यक्ती यांचेविरुद्ध भा.द.वि.कलल ३०७, ३५३, ३७९, ४२७, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत.