मुंबई (वृत्तसंस्था) श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. राष्ट्रहितासाठी ही मागणी करत असल्याचे शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे. फ्रान्समध्येही दहशतवादी हल्ला होताच तेथील सरकारने बुरखा बंदी केली. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात व ब्रिटनमध्येही हेच घडले आहे. मग याबाबतीत हिंदुस्थान मागे का? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला.
आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, श्रीलंकेत भीषण बॉम्बस्फोट झाले असले तरी भारतालाही याचे हादरे बसत आहे. जम्मू आणि कश्मीरलाही दहशतवादाने ग्रासले आहे. श्रीलंका, फ्रान्स आणि ब्रिटनसारखे देश कठोर पावले उचलत असतानाच आपण तशी पावले कधी उचलणार?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. विद्यमान मोदी सरकारने तिहेरी तलाकविरोधात कायदा आणला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. विद्यमान सरकारने ‘ट्रिपल तलाक’विरोधात कायदा करून पीडित मुस्लिम महिलांचे शोषण वगैरे थांबवले हे मान्य करताना, भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे, याकडेही उद्धव यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे.
तिहेरी तलाक आणि बुरखा बंदीविरोधात कोणी आवाज उठवला तर इस्लाम संकटात आल्याची बांग मारली जाते. खरे म्हणजे मुसलमानांना त्यांचाच धर्म नीट समजलेला नाही. मुसलमानांत कोणी फुले, शाहू निर्माण झाले नाहीत. किंबहुना होऊ दिले गेले नाहीत. त्यामुळे शहाबुद्दीन, आझम खान, ओवेसी बंधू व अबू आझमी या धर्मांध माथेफिरू नेत्यांचे फावले. धर्मांधता व त्यांच्यातील रूढी, परंपरा राष्ट्रीय सुरक्षेच्या आड येत असतील तर त्या मोडून काढल्या पाहिजेत. असेही अग्रलेखात म्हटले आहे.