सातारा प्रतिनिधी । शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वादग्रस्त विधानाचा साताऱ्यातून निषेध करण्यात येत असून आज उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तसेच यावेळी गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाच्या पाट्या लटकवून निषेध नोंदवण्यात आला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात छत्रपतींच्या वारसांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत, अशी टीका केली होती. राऊत यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे साताऱ्यातील बाजारपेठ आणि ठिकठिकाणची दुकाने बंद ठेवण्यात आल्याने सकाळपासूनच साताऱ्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले. उदयनराजेंच्या समर्थकांनी राजवाड्यातील गांधी मैदान ते साताऱ्यातील पोवई नाका असा मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर उदयनराजेंसाठी काढण्यात आलेल्या रॅलीत दोन गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाच्या पाट्या टांगून निषेध व्यक्त करण्यात आला. सातारच्या बाजारपेठेतल्या नेहमीच्या गजबलेल्या ठिकाणी आज शांतता पाहायला मिळाली. उदयनराजे यांच्या समर्थकांनी उर्त्फुतपणे बंदला पाठिंबा दिला. आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग लक्षणीय होता.