Home Cities अमळनेर पत्रकार दिनानिमित्त अमळनेरमधील विविध क्षेत्रांतील ‘रत्नांचा’ गौरव ; ६ जानेवारीला मान्यवरांना सन्मान...

पत्रकार दिनानिमित्त अमळनेरमधील विविध क्षेत्रांतील ‘रत्नांचा’ गौरव ; ६ जानेवारीला मान्यवरांना सन्मान सोहळा


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्याच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) शाखा अमळनेरच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील विविध क्षेत्रांतून आपल्या कार्यकर्तृत्वाने जिल्ह्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या मान्यवरांची निवड करून त्यांना सन्मानित केले जाणार आहे.

आगामी ६ जानेवारी रोजी आयोजित या भव्य सांस्कृतिक सोहळ्यात अनेक मान्यवरांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, आरोग्य, प्रशासन, पत्रकारिता तसेच कला व तांत्रिक क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश असून, निवड समितीने सखोल विचार करून ही यादी जाहीर केली आहे.

‘अमळनेर भूषण’ या सर्वोच्च मानाच्या पुरस्काराने माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील तसेच ओमप्रकाश मुंदडा यांना गौरविण्यात येणार आहे. शिक्षण व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल विजय नवल पाटील व माजी भिकन पाटील यांना ‘शिक्षण महर्षी’, तर माजी शिवाजीराव पाटील यांना ‘साहित्य रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

आरोग्य सेवेत समाजासाठी निःस्वार्थ कार्य करणारे डॉ. जी. एम. पाटील यांना ‘आरोग्य देवदूत’, तर डॉ. प्रशांत शिंदे यांना ‘आदर्श आरोग्य सेवा दूत’ म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक व धर्मदाय कार्याच्या क्षेत्रात मंगळग्रह मंदिर देवस्थानला ‘आदर्श देवस्थान’ पुरस्कार देण्यात येणार असून, सौ. रिता बाविस्कर, किरण (कृष्णा) बहारे, माजी प्रविण पाटील आणि ज्ञानेश्वर धनगर यांनाही त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गौरविले जाणार आहे.

उद्योग व व्यवसाय क्षेत्रात कैलास पाटील यांना ‘उद्योगरत्न’, तर प्रीतेश पारख, जितेंद्र गुंजाळ, रोनक संकलेचा आणि प्रेमकुमार शासनाणी यांना ‘युवा उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पारस गोल्ड यांना ‘आदर्श सुवर्णकार’ पुरस्कार प्रदान केला जाणार असून, आदर्श सरपंच म्हणून नितीन पाटील यांचा विशेष गौरव होणार आहे. तसेच विक्की जाधव, डिगांबर वाघ, महेश पाटील आणि अनिता सुरडकर यांनाही विविध क्षेत्रांतील योगदानासाठी सन्मानित केले जाईल.

प्रशासन व पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ केलेल्या सेवेबद्दल नानासो पांडुरंग पाटील यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील योगदानाबद्दल माजी एकनाथ सोनवणे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट सेवेसाठी सिद्धांत सिसोदे (पोलीस), अजय शिवरामे (कर्मचारी) तसेच वाहतूक पोलीस विभागालाही पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

कला व तांत्रिक क्षेत्रात गोविंद गायकवाड (गायक) आणि रविंद्र भोई (कलाकार) यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या कलेला आणि कार्याला या माध्यमातून सन्मान मिळणार आहे. या सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

समाजातील विविध घटकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून, या पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अमळनेर तालुकाध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांनी सोमवारी केली. निवड जाहीर होताच सर्व पुरस्कारार्थींवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

एकूणच पत्रकार दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यामुळे अमळनेरमधील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्थांना नवी प्रेरणा मिळणार असून, समाजात सकारात्मक कार्याला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound