चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीबाबत उपाययोजना करून दुष्काळी आर्थिक मदत तात्काळ मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
चोपडा तालुक्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून लवकरात लवकर पाण्याचे टँकर सुरु करा. चाऱ्याची टंचाई असल्याने मागणी करणाऱ्या पशुपालकास चार उपलब्ध करा. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना जिल्हा बँक व इतर बँक यांच्याकडून कर्ज उपलब्ध करा. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना शैक्षणिक फी व इतर फी १०० टक्के माफ करून ती फी शासनाने भरावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष दीपक सोनावणे यांची स्वाक्षरी आहे. यासोबतच दुसऱ्या निवेदनाद्वारे अवैध वाळू वाहतूक थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुकयातील जळोद, बुधगाव, निमगव्हाण, तांदलवाडी या गावातील नदी पात्रातील वाळूचा मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उपसा केला जात आहे. यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जमिनीतील पाण्याची पातळीत दिवसेंदिवस घट आहे. याचा फटका शेतकरी, ग्रामस्थ याना बसत आहे. यावर प्रशासनाने वेळेवर कारवाई करावी अन्यथा प्रशासनाला यास जबाबदार धरण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.