जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर झालेल्या ईडीच्या कार्यवाईच्या निषेधार्थ आज मोर्चा काढण्यात आला. यावेळी आकाशवाणी चौकात मोर्चाने हिंसक वळण घेत टायर जाळून रास्तारोको आंदोलन केले.
या संदर्भात अधिक असे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने नुकताचा शिखर बँक घोटाळ्याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. परंतू पवार यांना महाराष्ट्रात मिळत असलेला प्रतिसाद बघत त्यांना यात भाजप सरकारने मुद्दाम गोवल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी कार्यालयापासून जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. घोषणाबाजी करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर मोर्चा परत जात असतांना काही कार्यकर्त्यांनी टायर जाळत रास्तारोको आंदोलन केले. यामुळे काहीवेळ वाहतूक प्रभावित झाली होती. नंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी तेथून उठण्यास भाग पाडले. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, योगेश देसले, पठाण मजहर, नितीन पाटील,अरविंद मानकरी, रमेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.