रत्नागिरी वृत्तसंस्था । जगबुडी नदीने आठवड्याभरात तिस-यांदा धोक्याची पातळी ओलांडली असून आज दि. 29 जुलै रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास 8 मीटर पाणी पातळी गाठली आहे. या आधीच सकाळी 6 वाजता धोक्याचा इशारा देण्यात आला होता.
त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेल्याने हा महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. तसेच खेडमधील जगबुडीच्या आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा ही देण्यात आला आहे. त्यापूर्वीच जगबुडी नदी धोक्याची पातळी गाठण्याची चिन्हे दिसू लागल्याने पहाटे ६ वाजताच धोक्याचा इशारा जारी करण्यात आला होता. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खेडची रस्ते वाहतूक बंद करण्यात आले आहे. गेल्या आठवड्याभरा पासून रत्नागिरीत पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात पडणारा पाऊस यामुळे जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटीश कालिन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जगबुडी आणि वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खेडमधील मार्केटसह घराघरात पाणी शिरले आहे. बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यापारी आणि छोट्या दुकानदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे सह्याद्री खोऱ्यातील काही गावांचा संपर्क तुटला असून येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.