भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता व्यापक स्वरूपात जल संधारण क्षेत्रात संस्थेच्या वतीने भरीव कार्याची दखल घेऊन जल शक्ती मंत्रालय भारत सरकारतर्फे त्यांना “वॉटर हिरो” म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
रणजितसिंग राजपूत यांनी खडका किन्ही भागात दगड मातीचे बांध बांधून पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविले ह्या कार्यासाठी त्यांनी सुमारे तीन महिने परिश्रम घेतला व शहरात आदर्श निर्माण केला. गेल्या वर्षी उन्हाळ्याची सुट्टी सतकर्मी लावून चोरवडच्या नाल्यावर रणरणत्या उन्हात दर शनिवारी व रविवारी चार तास श्रमदान करून नाला खोलीकरण करत नदी पुनर्जीवन प्रकल्प राबविला. ह्या प्रकल्पाद्वारे चोरवड नाल्यातील साठलेली दगड माती इत्यादी श्रमदानाच्या मदतीने बाजूला करून त्यात सहा ठिकाणी बांध घालण्यात आले. युवकांच्या श्रमदानातून खोलीकरण करीत त्याला प्रवाहात आणण्याचे कार्य संस्थेच्या वतीने सुमारे चार महिने चालले. ह्यात भुसावळ शहरातील अनेक नागरिकांनी देखील सहभाग नोंदविला व पावसाळ्यात ह्या बंद स्वरूपात असलेल्या नाल्याचे एका वाहत्या नदीत रूपांतर झाले. ह्यात सुमारे दहा लक्ष लिटर जलसाठा एकत्र करण्यात आला. नाल्याचे नदीत रुपांतर केले.
चोरवड गावाजवळील हा प्रकल्प यशस्वी ठरला. कार्य मोठे असल्याने मोठ्या स्वरूपात जलदुत ह्या कार्यात जोडले गेले . श्रमदानासोबतच शेवटच्या टप्प्यात यंत्र सामग्रीची ही मदत घेण्यात आली. शहरातील दात्यांनी जेसीबी, ट्रॅक्टर, पोकलँड आदी यंत्रणा उपलब्ध करून दिली. या उपक्रमात आमदार संजय सावकारे ह्यांनी देखील सहभाग नोंदविला होता. भुसावळ शहरात तरुणाईला दिशा देऊन त्याच्या कडून विधायक कार्य रणजितसिंग राजपूत ह्यांनी घडवून आणले आहे. ह्या कार्याची दखल घेत जल शक्ती मंत्रालय जल संसाधन, नदी विकास आणि गंगा सरंक्षण विभाग भारत सरकार ह्यांच्या वतीने रणजितसिंग राजपूत ह्यांना “वॉटर हिरो” ने सन्मानित करण्यात आले. ह्या संदर्भात त्यांना मंगळवार रोजी जल शक्ती मंत्रालय सचिव ह्यांच्याकडून मेल प्राप्त झालेला आहे. यात संपूर्ण देशभरातून ८ वॉटर हिरोज ना नामांकित केले गेले त्यातील एक रणजितसिंग राजपूत आहे.
दरम्यान, भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय तर्फे माझ्या कार्याची दखल घेऊन मला “वाटर हिरो” सन्मानित केले याचा आनंद आहे. संस्कृती फाउंडेशनच्या माध्यमातून झालेली जलक्रांती नक्कीच यशस्वी ठरली आहे. या कार्याचे श्रेय प्रत्येक जलदुताचे आहे. ज्याने सलग ह्या कार्यात माझ्या बरोबर मेहनत घेतली. ह्या जलसंधारण क्षेत्रात कार्याला पुढील वर्षी व्यापक स्वरूप दिले जाईल असे संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी सांगितले.