Home प्रशासन नगरपालिका सावदा नगरपालिकेत भाजपच्या गटनेतेपदी रंजना भारंबे, तर उपगटनेतेपदी प्रतीक्षा भंगाळे यांची निवड

सावदा नगरपालिकेत भाजपच्या गटनेतेपदी रंजना भारंबे, तर उपगटनेतेपदी प्रतीक्षा भंगाळे यांची निवड


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर शहराच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचा अधिकृत नगरसेवक गट स्थापन करण्यात आला आहे. यासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे अधिकृत नोंद करण्यात आली असून सावदा शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या नव्या गटात गटनेतेपदी भारतीय जनता पार्टीच्या सौ. रंजना जितेंद्र भारंबे यांची तर उपगटनेतेपदी शिवसेनेच्या सौ. प्रतीक्षा मनीष भंगाळे यांची सर्वानुमते आणि एकमताने निवड करण्यात आली. युतीतील सर्व नगरसेवकांनी एकमताने या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पुढील कार्यकाळात समन्वयाने काम करण्याचा संकल्प केला.

गट स्थापनेच्या वेळी सावदा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रेणुका पाटील यांच्यासह भाजपा–शिवसेना युतीचे सर्व नगरसेवक माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. यावेळी शहराच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्रित धोरण राबवण्यावर भर देण्यात आला.

नवीन गटनेतृत्वाच्या माध्यमातून सावदा शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांना प्राधान्य देण्यात येईल आणि पारदर्शक, लोकाभिमुख प्रशासन राबवले जाईल, असेही युतीतील सदस्यांनी स्पष्ट केले.

या निवडीबद्दल सौ. रंजना भारंबे आणि सौ. प्रतीक्षा भंगाळे यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी सौ. साधना महाजन, नंदु महाजन,  प्रल्हाद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष दुर्गेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख  सूरज परदेशी, तालुका सरचिटणीस  महेश अकोले यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक तसेच भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound