यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सण-उत्सव व कामाच्या व्यापात व्यस्त असलेल्या महिलांना एक दिवस विश्रांती मिळावी आणि त्यांच्या सन्मानासाठी विशेष कार्यक्रम घडवून आणावा, या उद्देशाने यावल तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध पारंपरिक आणि मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती कवडीवाले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा करून झाली. यानंतर डॉ. कवडीवाले यांनी उखाणा घेत महिलांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. कार्यक्रमादरम्यान महिलांनी उत्साहाने उखाणे घेतले, संगीत खुर्ची, निम्बू-चमचा शर्यतीसारख्या खेळांमध्ये भाग घेतला आणि आनंद लुटला.
याप्रसंगी प्रत्येक उपस्थित महिलांना हळदी-कुंकवाचे पारंपरिक वाण म्हणून पर्स, लक्ष्मी पादुका, हळदी-कुंकू पात्र, तसेच तिळगूळ वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका मनिषा कोळी, मोनिका फर्नांडिस, वृषाली पाटील, रमा पवार यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनैना राजपूत यांनी केले. तसेच, गटप्रवर्तक चित्रा जावळे, लीना पाटील आणि आशा स्वयंसेविका यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावून आनंददायी क्षण अनुभवले.