नवी दिल्ली । राजस्थानातील राजकीय नाट्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपने संविधानाची सर्कस केली असून लोकशाहीला द्रौपदी केले असल्याची घणाघाती टीका केली आहे.
राजस्थानातील सत्ता संघर्ष आता उफाळून आल्याचे दिसून येत आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपावर टीकास्त्रसोडले आहे. भाजपानं संविधानाची सर्कस केल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे.
सुरजेवाला यांनी ट्विट करून म्हटले आहे की, भाजपानं संविधानाची सर्कस केली आहे. त्यांनी लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण करणार्या कौरवांचं जे झालं होतं तेच राजस्थानची कृष्णरूपी जनता भाजपाच्या कटाचं करेल. आता न्याय मिळेल, असं सुरजेवाला म्हणाले.
तसेच, जेव्हा काँग्रेसकडे बहुमत आहे, सभागृहदेखील भरवायचं आहे, तसंच हा अधिकार सरकारचा आहे तेव्हा भाजपावाले आणि त्यांचे अनुयायी का पाठ दाखवून पळून जात आहे. दिल्लीत सत्तेवर बसलेल्यांना विधिमंडळात बहुमताची भीती का वाटत आहे?, असा सवालही सुरजेवाला यांनी दुसर्या ट्विटच्या माध्यमातून केला आहे.