मुंबई – वृत्तसेवा । शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार तहव्वुर हुसैन राणा याला येत्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फाशी देणार असे भाकीत केले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत हे आज पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, “तहव्वुर राणाला फाशी ही त्वरित देण्यात यायला हवी, मात्र केंद्र सरकार ही कारवाई बिहार निवडणुकीदरम्यान करेल.” ते पुढे म्हणाले की, राणाला भारतात आणण्यासाठी गेल्या 16 वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत, आणि ही प्रक्रिया काँग्रेसच्या कारकिर्दीतच सुरू झाली होती. त्यामुळे याचे श्रेय कुणीही राजकीय फायद्यासाठी घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी हेही नमूद केले की, तहव्वुर राणा हा भारतात प्रत्यार्पित होणारा पहिला आरोपी नाही. यापूर्वी 1993च्या साखळी बॉम्बस्फोटांतील आरोपी अबू सालेमलाही भारतात परत आणण्यात आले आहे. यासोबतच राऊत यांनी आर्थिक घोटाळ्यांतील फरार आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांना भारतात परत आणण्याची जोरदार मागणी केली. तसेच, पाकिस्तानात अटकेत असलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याही सुरक्षित परतफेरची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, कुलभूषण जाधव यांना 2016 मध्ये इराणमधून जबरदस्तीने अपहृत करून पाकिस्तानात आणले गेले होते. त्यांच्यावर पाकिस्तानात बनावट आरोप लावून लष्करी न्यायालयाने मृत्युदंड सुनावला होता. भारताने या निर्णयाविरोधात इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये याचिका दाखल केली होती, ज्यात कोर्टाने जाधव यांच्या फाशीवर तात्पुरती स्थगिती दिली होती.
या मुद्द्यांवरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर राजकीय हेतूने कारवाया करण्याचा आरोप करत, राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयावर राजकारण न करता कठोर आणि त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली आहे.