यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात अन्न भेसळ व औषध प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी मोठया प्रमाणावर गुटखा माफिया विरूद्ध कारवाई सत्र सुरू आहे. मात्र दुसरीकडे यावल तालुक्याच्या कार्यक्षेत्रात न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची शेजारच्या दोन राज्यातुन तस्करीतुन आयात करून विक्रीस येणाऱ्या मौखिक आरोग्यास गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण करणारा विमल पानमसाला गुटक्याची सर्रासपणे विक्री सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत या विषयाकडे संबधीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याचे चर्चा अनेक पालक व सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे. या गुटखा विक्रीवर कारवाई कोण व कधी करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे.
यावल, चोपडा आणि रावेर हे तिन्ही तालुके सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असुन सीमा रेषेवर गुजरात आणि मध्यप्रदेश अशी दोन राज्य तालुक्यास लागून असल्याने या दोन्ही राज्यातुन मोठया प्रमाणावर न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या विमल गुटखा या पानमसालाची खाजगी वाहन व प्रसंगी एसटीव्दारे चोरट्या मार्गाने महाराष्ट्र वाहतुक करून यावल तालुक्यातील काही गुटखा माफियांकडून करण्यात येत आहे. नंतर एका गोदामात या गुटख्याची साठवण करून तालुक्यात विविध ठिकाणी विक्रीसाठी या गुटक्याची टप्प्या टप्याने वाटप करण्यात येत आहे. शेजारच्या परप्रांतातुन छुप्या मार्गाने आयात करून येणाऱ्या या हानिकारक पानमसाला गुटख्याची एका महिन्यास सुमारे ५० ते ६० लाखाची विक्री करण्यात येत आहे. या बाबतची माहीती संबधीत अन्न व औषध प्रशासन विभागाला नसावी का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत असुन जिल्ह्यात अनेक ठिकाणी लाखो रुपयांचा गुटखा पकडला जात आहे. मात्र यावल तालुक्यात प्रशासनाकडुन या विषयाकडे अर्थपुर्ण डोळेझाक करण्यात येत असल्याने कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.