
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जळगाव शहरात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात जल्लोष साजरा केला. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी निवडून जाणाऱ्या चार जागांपैकी भारतीय जनता पक्षाने आंबेडकरी चळवळीतील प्रमुख चेहरा म्हणून ओळख असलेल्या रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा संधी दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने रेल्वे स्टेशन परिसरात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या वेळी पक्षाचे महानगर अध्यक्ष तथा नगरसेवक अनिल अडकमोल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी “जय भीम”, “रामदास आठवले जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कार्यक्रमानंतर ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या उत्सवात पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये जिल्हा सचिव भरत मोरे, प्रताप बनसोडे, राजेश सोळुखे, किरण अडकमोल, नरेंद्र मोरे, हरीश शिंदे, किरण पाटील, अक्षय मोरे, ईश्वर चंद्रे, अक्षय मेघे, मिलिंद अडकमोल यांच्यासह महिला आघाडीच्या मंगला कुमावत, प्रमिला सपकाळे, सोनाली अडकमोल, शिला सोनवणे, सकूबाई सोनवणे, कमल मोरे, रेखा सोनवणे, नंदा बिहाडे, रेखा अहिरे, छाया बिहाडे, संजना बिहाडे, सुनिता गाडे, पूजा तायडे, शालू सपकाळे, विमल सपकाळे, प्रमिला गायकवाड, प्रभा ठाकूर, लता भालेराव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय भीमराव बनसोडे, बबलू कोळी, रविंद्र सुरवाडे, दिलीप अहिरे, सुभाष सपकाळे, राहुल सोनवणे आणि दिनेश सोनवणे यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यकर्त्यांनी यावेळी आनंद व्यक्त करत रामदास आठवले यांना राज्यसभेवर पुन्हा पाठवण्याचा निर्णय हा आंबेडकरी चळवळीला बळ देणारा असल्याचे मत व्यक्त केले. सामाजिक न्याय, वंचित घटकांचे प्रश्न आणि आंबेडकरी विचार संसदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी आठवले यांना पुन्हा संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.



